सिंहगडरस्ता – वडगाव पुलाजवळ मुख्य रस्त्यावर पीएमपी आणि एसटी बस स्टॉप अपघातास कारणीभूत ठरत असलेला बसथांबा अखेर एनएचएआय आणि पोलिसांनी कारवाइ करीत काढून टाकला. या थांब्यामुळे बस रस्त्यातच उभ्या केल्या जात होत्या यातून अपघाताचा धोका वाढल्याबाबतचे वृत्त प्रभात मध्ये प्रकाशित करण्यात आल्यानंतर धोकादायक बसथांबा तातडीने काढण्यात आला.
भाजयुमोचे सारंग बाळासाहेब नवले यांनी सांगितले की, वडगाव पुलाजवळ मुख्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारे आलपी वाहने घेऊन पीएमपी आणि एसटीचे प्रवासी पळविण्यासाठी याच ठिकाणी उभे राहत असल्याने रस्ता अरूंद होऊन अपघात घडत होते. त्यामुळे धोकदायक बसथांबा काढण्याची मागणी सातत्याने केली जात होती. याबाबत वृत्त येताच प्रशासनाकडून कारवाइ करण्यात आली.
एनएचएआयचे अधीक्षक अभियंता एस. एस. कदम यांनी सांगितले की, मुख्यरस्त्यावर बसथांबा करण्यास परवानगी नसल्याने संबंधित विभागाशी चर्चा करून सदर कार्यवाही करण्यात आली. पीएमपीएलने हा बसथांबा रातोरात उभा केला होता. त्यांना अपघातांबाबत माहिती देत बसथांबा काढण्याबाबत सूचना केली होती, त्यानुसार तो काढण्यात आला असल्याचे वडगाव वाहतूक पोलीस शाखेचे सहायक निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले.