पुणे – मावळते पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची महासमादेशक होमगार्ड म्हणून बदली झाली आहे. मागील वर्षभरात शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी पुणेकरांचे मन जिंकले होते. त्यांनी अवघ्या वर्षभरात ११५ गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावला होता. तर शहरातील १०० गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केले होते.
रितेश कुमार यांचा पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ दि. १६ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२४ असा राहिला. या काळात त्यांनी गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर क्राइमसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी धडक कारवाईचा बडगा उगारला. एवढ्या कमी कालावधीत प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार हे पहिलेच पोलीस आयुक्त असावेत.
बुधवारीच त्यांनी शंभरावी एमपीडीए कारवाई राजू हनुमंत गायकवाड ( ३९, रा. हडपसर) या गुंडाविरुद्ध केली. गायकवाडविरुद्ध गंभीर सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते. दरम्यान, गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील १६ जणांवर मोक्का कारवाईदेखील रितेश कुमार यांच्या कार्यकाळात झाली. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सुरू केलेले मोक्का कारवाईचे सत्र त्यांनी वेगाने पुढे नेले.
मुंबईच्या धर्तीवर तरंग २०२३ चे यशस्वी आयोजन
रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना अवगत व्हावी, तसेच सुसंवाद निर्माण व्हावा, यादृष्टीने रितेश कुमार यांनी तरंग-२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन केले होते. मुंबई पोलिसांच्या उमंगच्या धर्तीवर हा कार्यक्रम यशस्वी झाला.
बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली. होप फॉर दी चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. येथे विधीसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे समुपदेशन केले जाते. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते.