सभापतिपदी गणेश जगदाळे, उपसभापतिपदी शरद कोळपे
दौंड – दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर इतिहासात प्रथमच भाजपने वर्चस्व मिळवले असून सभापतिपदी गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाली झाली.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली होती. यावेळी भाजपला नऊ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या; मात्र गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले संपत निंबाळकर यांचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यामुळे संख्याबळ हे भाजप 9 व राष्ट्रवादी 8 झाले.
गुरुवारी (दि. 25) दौंड येथे बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपकडून सभापतिपदासाठी गणेश जगदाळे व राष्ट्रवादीकडून बाळासाहेब शिंदे यांनी उपसभापतिपदासाठी भाजपकडून शरद कोळपे व राष्ट्रवादीकडून वर्षा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये गणेश जगदाळे यांना 9 व बाळासाहेब शिंदे यांना 8 मते मिळाली. उपसभापतिपदासाठी शरद कोळपे यांना 9 व वर्षा मोरे यांना 8 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हर्षित तावरे यांनी काम पाहिले. यावेळी सर्व संचालकासह आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नंदू पवार,नामदेव बारवकर, महेश भागवत,माऊली ताकवणे,नीलकंठ शितोळे ,धनजी शेळके, हरिभाऊ ठोंबरे, तुकाराम ताकवणे,विकास शेलार,जयदीप सोडनवर, उमेश देवकर आदी उपस्थित होते.
ना गुलाल.. ना… फटाके..
दौंड तालुका बाजार समितीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ संचालक संपत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. बाजार समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असतांना आमदार राहुल कुल यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकर्त्यांनी ना गुलाल उधळला ना फटाके वाजवले.