शिताफीने केले जेरबंद
मंचर – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी दुर्गम भागातील पाटण परिसरात रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात बुधवारी (दि. 2) सकाळी 10 वाजता अचानक बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाल होती. बिबट्या घरात शिरला त्यावेळी घरात फक्त महिलाच होत्या. मात्र या महिलांनी अत्यंत सावधतेने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि जीव वाचल्याने सुटकेचा
निःश्वास सोडला.
आदिवासी भागात असणाऱ्या पाटण गावच्या हद्दीत बिबट्या सकाळी मसळे यांच्या घरात शिरला. बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. पावसात भिजल्याने तो आजारी असल्याचे त्याच्या सडलेल्या शेपटीवरून दिसून येत होते. याबाबत घरातील महिला सुगंधा मसळे आणि जिजाबाई मसळे यांना बिबट्या घरात दिसल्याचे समजल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी कुठलाही आवाज न करता आपली बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आदिवासी भागात घरात बिबट्या शिरल्याने या दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात मोबाइल फोन लागत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.
बिबट्या जखमी व आजारी असल्यामुळे त्याला घरातुन काढणे आवघड झाले होते. जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील याच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, रेसक्यु पथक आणि स्थानिकांच्या सहकार्याने त्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्या आजारी असल्याने त्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा नर जातीचा बिबट्या सहा वर्षाचा असून त्याच्या अंगावरील जखमा कशाच्या आहे याचा शोध घेतला जाईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी सांगितले.
15 वर्षांनंतर पुन्हा दर्शन
आदिवासी डोंगरी भागातील विविध भागामध्ये बिबट्याचा वावर 15 वर्षापूर्वी सर्रास होता; परंतु अलीकडच्या काही वर्षात बिबट्या दिसतच नव्हता; परंतु पाटण येथे थेट बिबट्याच घरातच आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात सध्या भातशेती लागवडीची कामे सुरू आहेत.