नारायणगाव -खोडद (ता. जुन्नर) येथील गडाचीवाडी परिसरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या चार जणांवर पाक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
शुभम प्रकाश गाडेकर (वय 21), प्रकाश विठोबा गाडेकर, रोहिदास विठोबा गाडेकर (तिघे रा. खोडद, ता.जुन्नर), प्रवीण लक्ष्मण वाघ (वय 18 रा. ओझर खेड ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी. के. गुंड म्हणाले की, सोमवारी (दि. 16) मध्यरात्री 12.30च्या सुमारास खोडद गडाचीवाडी येथील दोन अल्पवयीन मुली या घरी काही न सांगता अचानक निघून गेल्या होत्या. या मुली अल्पवयीन असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला असताना आरोपी शुभम, प्रकाश, रोहिदास यांनी संगनमताने मुलींना फूस लावून नाशिक येथे पाठवून दिल्याचे निष्पन्न झाले.
या तिघांनी अल्पवयीन मुलींना नाशिक येथे एसटी बसने पाठविलेले होते; परंतु त्यानंतर या मुलींचा मोबाइल बंद झाल्याने त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. त्यामुळे या मुली कोठे गेल्या याविषयी माहिती नव्हती.
तांत्रिक माहितीवरून या मुली पालघर जिल्ह्यातील मोखाडा या ठिकाणी असल्याचे समजताच नारायणगावचे पोलीस हवालदार एस. एम. टाव्हरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल भेके, वाघमारे यांच्या पथकाने अवघ्या 48 तासांच्या आत पालघर येथील जंगल परिसरातून दुर्गम भागात जाऊन मुलींचा शोध घेतला. या मुलींसह पालघर येथे अल्पवयीन मुलींना फूस लावून बोलावून घेणाऱ्या प्रवीणला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार टाव्हरे, पोलीस नाईक दिनेश साबळे, अतुल भेके, सचिन कोबल, प्रवीण लोहोटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजु मोमीन यांनी केली.