राजगुरूनगर -पुणे-नाशिक महामार्गावरील खेड टोल नाका ते मोशी टोल नाका या 17.77 किलोमीटर लांबीच्या 650 कोटी रकमेच्या कामास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, नाशिकफाटा ते खेड महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी 2013 पासून पाठपुरावा सुरू केला होता. 2014 मध्ये येथील शासन केंद्रात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या महामार्गाचे महत्त्व विषद केले होते. चाकण आणि भोसरी एमआयडीसीसह दैनंदिन मोठ्या प्रमाणाची वाहतूक पाहता भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले. त्यादृष्टीने प्रकल्पाचा सविस्तर अहवाल बनविण्याचे आदेश त्यांनी या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकल्पाचा डीपीआर बनविताना 2015 ते 2016 या दोन्ही वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे सचिव, प्रकल्प संचालक, डीपीआर बनवणारी सल्लागार कंपनी, पुणे जिल्हाधिकारी, भूसंपादन विभागाचे अधिकारी आदीं समवेत सातत्याने पाठपुरावा व बैठका घेऊन प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या. या प्रयत्नांना यश मिळून जानेवारी 2016 मध्ये 29 किलोमीटर लांबीच्या नाशिक फाटा ते खेड महामार्गाच्या सहापदरीकरण कामाचा डीपीआर अंतिम करून मंजुरी दिल्याने व भूसंपादनास सुरुवात करीत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे कळविले.
त्यानुसार या कामाची 1013 कोटींच्या निविदा प्रक्रिया डिसेंबर 2017 मध्ये राबविण्यात आली.पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिका हद्दीतील मोशी ते नाशिक फाटा या महामार्गावरील डीपीआरला हरकत घेतल्याने त्यावेळी निविदा प्रक्रिया थांबवावी लागली होती. त्यानंतर संपूर्ण महामार्गाचा नव्याने डीपीआर करण्यास एक वर्षाचा कालावधी लोटला.
अन्यथा या महामार्गाचे काम बऱ्याच अंशी पूर्णत्वास आले असते. नाशिक फाटा ते मोशी डीपी प्लॅनमध्ये महापालिकेने काही सूचना दिल्याने व भूसंपादनात काही पर्याय सुचविल्याने या भागाचे रुंदीकरण दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. मोशी टोल नाका ते खेड टोल नाका हा रस्ता सहापदरीकरण लवकरच पूर्ण होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
रुंदी 60ऐवजी राहणार 40 मीटर
रस्त्याची रुंदी त्यावेळी 60 मीटर निश्चित करण्यात आली होती. मात्र, या महामार्गावरील भूसंपादनातील वाढत्या अडचणी लक्षात घेता 45 मीटर महामार्गाची रुंदी असणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ठेवण्यात आला असून चाकण येथे 2.25 किमी लांबीचा मोठा उड्डाणपूल तसेच 7 व्हेईकल अंडरपास व 2 ठिकाणी ओव्हरपास करण्यात येणार आहे.