केंदूर – शिरूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली आहे. मंगळवारी (दि. 8) सरपंच आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवरील इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.
सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती तहसीलदार एल. डी. शेख यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यातील एकूण 93 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामध्ये 57 जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत पैकी 29 सर्वसाधारण महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 25 जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यात 13 महिलांसाठी जागा आरक्षित आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 3 पैकी महिलांना 2, अनुसूचित जातीसाठी 8 पैकी महिलांना 4 जागा आरक्षित आहेत. अशा प्रकारे शिरूर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार आहे. नव्याने तीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, मात्र या ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणातून सद्या तरी प्रलंबित राहणार आहेत.