जेजुरी (ता. पुरंदर) : शाकंभरी (पौष) पौर्णिमेनिमित्त कुलदैवत खंडेरायाचा गाभारा फळ-पालेभाज्यांनी सजवला होता.
जेजुरी – कुलदैवत खंडेरायाचा शाकंभरी उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेच्या पूजेच्या वेळी फळ व पालेभाज्याची आरास करण्यात आली होती. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो.
यंदा शाकंभरी उत्सव पौष शुक्ल अष्टमीला अर्थात गुरुवारी (दि. 18) सुरू झाला तर गुरुवार (दि. 25) अर्थात शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये शाकंभरीची देवीची पूजा केली जाते. शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या शेंग वर्गीय भाज्या अशा सर्व भाज्यांची पूजा केली जाते. श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये श्रीखंडोबा सोबत आदिमाया शक्ती पार्वती असल्याने मंदिरामध्ये शाकंभरी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये मेघमल्हार प्रतिष्ठान, कुलस्वामी खंडोबा देवाचे मुख्य गुरव पुजारी, तसेच वीर, कोळी घडशी, नित्य वारकरी, मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. यावेळी ऋषिकेश बारभाई, संतोष गायकवाड, देविदास बोरकर, सचिन गायकवाड, सूर्यकांत नेवसे, माईसाहेब सोनवणे, किरण कुदळे, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे आदी उपस्थित होते. या पूजेमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, गाजर, मुळा, सिमला व हिरवी मिरची, कारले, कांदे, कांदेपात, मेथी, कोथिंबीर आदी सुमारे 125 किलो फळ-पालेभाजी वापरण्यात आली.