ओतूर – नगर कल्याण महामार्गावर वाटखळे गावच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी व छोटा हत्तीचा चालक यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.12) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.
संदीप जयसिंग सुपेकर (वय 41, रा. नांदूर, खंदर माळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), चालक अमर चंद्रकांत रोडे (वय 26, रा. धामणी, ता. आंबेगाव, जि. पुणे), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा पीकअप जीप व छोटा हत्ती यांची नगर- कल्याण महामार्गावर वाटखळे (ता. जुन्नर) गावच्यानजिक असणाऱ्या वळणावर समोरासमोर धडक झाली. यात छोटा हत्तीमधील प्रवासी संदीप जयसिंग सुपेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
चालक अमर चंद्रकांत रोडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही अपघात ग्रस्त वाहने ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन डोळस करीत आहेत.