रेडा -मागील वीस वर्षांपासून चंद्रपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी क्रीडा अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना, क्रीडा क्षेत्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील खेळाडूंमधील कौशल्य आणि क्षमता ओळखून त्यांच्यासाठी इंदापूर तालुका क्रीडा संकुलचा सर्वांगीण विकास करणार आहे, असे मत नूतन तालुका क्रीडाधिकारी महेश चावले यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांची बदली झाल्यानंतर नामवंत क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी इंदापूर तालुक्याचा पदभार नुकताच स्वीकारला. त्यांचा इंदापूर तालुका क्रीडा प्रेमी व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर पंच समिती सदस्य सतीश पांढरे, युवा नेते अमोल इंगळे, संदीप रेडके, गणेश शिंगाडे, अशोक करे, सुधीर पाडूळे, नारायण आसबे, राहुल शिंदे, दिग्दर्शक शिवकुमार गुणवरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना क्रीडा अधिकारी महेश चावले म्हणाले की, 2009 ते 13 या कालावधीत इंदापूर तालुक्यात सेवा दिली आहे.
या तालुक्यातील सामाजिक, राजकिय व भौगोलिक परिस्थितीचा जवळून अभ्यास आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वांगीण विकास करणार आहे. राज्यात सर्वात पहिले क्रीडा संकुल म्हणून इंदापूर क्रीडा संकुलला मान्यता मिळाली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या मातीतून अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. येणाऱ्या काळात इंदापूर क्रीडा संकुलवर अनेक सुविधा आणून, तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन इंदापूर तालुक्याला लौकिक मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.
पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने व्यायामशाळा अनुदान योजना असून ती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मध्यमातून राबवली जाते. त्या माध्यमातून तालुक्यातील खेळाडूंना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही नूतन क्रीडाधिकारी महेश चावले यांनी सांगितले.