* साथरोगाचे प्रमाण वाढल्याने देऊळगाव परिसरातील नागरिक संतप्त
*शाळा अन् घरोघरी आरोग्य तपासणी करण्याची मागणी
* आरोग्य केंद्रात अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थ त्रस्त
देऊळगाव राजे – दौंड तालुक्याच्या पूर्व भागात थंडी, ताप, खोकला, सर्दीच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. परंतु येथील आरोग्य केंद्रात अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने आरोग्य सेवा डळमळली असल्याचे दिसून येत आहे. परिसरात साथरोगाचे प्रमाण वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
सध्या लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना थंडी, ताप, खोकला, सर्दी व अंगदुखी हे मुख्य आजार आहेत. हे व्हायरल इन्फेक्शन करोनाचे तर नाही ना? अशी चर्चा आता पालक वर्गात सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. परंतु याकडे देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रत्येक वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन केला तरी फोन उचलला जात नाही. त्यामुळे घरोघरी तपासणी तर सोडाच पण आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रुग्णालाही नीट आरोग्य सेवा मिळत नाही. दुसरीकडे नागरिक महागाईने होरपळत असताना साथीच्या अजाराने थैमान घातले आहे. त्यात राज्य शासनाच्यावतीने नेमण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अजूनच नागरिकांचे दुर्दैवी हाल होत आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
देऊळगाव राजे येथील प्राथमिक केंद्रामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला स्थायी असणे बंधनकारक असून सुद्धा बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तसेच दि. 1 ते दि. 8 तारखेपर्यंत कार्यालयीन बैठका असल्यामुळे बरेच कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल.
– अविनाश अलमवार, वैद्यकीय अधिकारी, देऊळगाव राजे
देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तेथील अधिकारी कायम वेळेवर उपस्थितीत नसतात. याबाबत अनेकवेळा रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत डळमळलेली आरोग्यसेवा सुरळीत करावी.
– केशव काळे, माजी सरपंच शिरापूर