पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकली आहे. परंतु राष्ट्रवादीकडून आरोप सुरू असल्याने शहर भाजपा पुरती घायाळ झाल्याचे चित्र आहे. त्यातच शनिवारी (दि. 7) अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने भाजपला टार्गेट केल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची 2002 ते 2017 या पंधरा वर्षांच्या कालावधीत एकहाती सत्ता होती. या सत्तेला पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीत असलेल्या मात्र मोदी लाटेत भाजपवासी झालेल्या नेत्यांनी सुरूंग लावत 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार केले. स्थानिक, बाहेरचा हा मुद्दा तापवितानाच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर प्रहार करत तब्बल 77 नगरसेवक निवडून आणले होते.
अतिआत्मविश्वासात असलेल्या राष्ट्रवादीला हा पराभव पचविणे जास्तच जड गेले होते. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि सध्या 2022 च्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपकडून अपेक्षित विकासकामांना गती देण्यात आलेले अपयश, भ्रष्टाचाराची प्रकरणे, लाचखोरी, खंडणीखोरीत अडकलेले भाजपचे नगरसेवक यामुळे भाजपची गोची झाल्याचेच पहावयास मिळत आहे.