खासदार डॉ. कोल्हे यांची माहिती : मंदिरावर कळस बसणार
नारायणगाव –जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर मंदिराच्या मजबुतीकरणासह अन्य कामांसाठी दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचे काम करण्याच्या दिशेने पाहिले पाऊल पडले असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पुरातन कुकडेश्वर मंदिरावर कळस नसल्याने स्थानिक आदिवासी अनेक वर्षांपासून कळस बांधण्याची मागणी करीत होते; परंतु मंदिराचे स्ट्रक्चर वजन पेलण्यास सक्षम नसल्याने कळस बांधता येणार नाही, अशी भूमिका राज्य पुरातत्व विभागाने घेतली होती; परंतु हिंदू मंदिरामध्ये कळसाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने कळस उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
नासाडिया वास्तुविशारद सल्लागार संस्थेने केलेल्या पाहणीअंती कळसाचे वजन पेलण्याची क्षमता सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये नसल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सहायक संचालक डॉ. विलास वहाणे व सल्लागार संस्थेचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी करून मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट करून मंदिराचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुकडेश्वर मंदिराच्या छताचे मजबुतीकरण, संरक्षण भिंत, मंदिराच्या आतील व बाहेरील दगडी फरशी, मूर्तींची दुरुस्ती व संवर्धन तसेच माहितीचे फलक आदी कामांसाठी दोन कोटी सहा लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली असून कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.