आंबेगावात सात टन चिकन, दीड टन मटण फस्त
चिकन १६० रुपये किलो
मटण ७०० रुपये किलो
अंडी डझनाला ९० रुपये
मंचर – आंबेगाव तालुक्यात रविवारी (दि. ३१) सकाळपासूनच चिकन, मटणच्या दुकानावर खरेदीसाठी शौकिनांनी गर्दी केली. तालुक्यात ४०० चिकन आणि १५ मटण दुकानने आहेत. मार्गशीर्ष महिना असूनही सात टन चिकन आणि दीड टन मटणावर खव्वयाने ताव मारल्याची माहिती चिकन, मटण व्यावसायिक संघटनेने दिली. तालुक्यात चिकन १६० रुपये किलो दराप्रमाणे विकले गेले, तर मटणाचे दर ६६० ते ७०० रुपये किलोप्रमाणे होते.
मांसाहार विकण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचा फारसा परिणाम ३१ डिसेंबरला जाणवला नाही. कळंब, मंचर, एकलहरे, अवसरी, घोडेगाव, महाळुंगे, निरगुडसर, पारगाव यांसारख्या बहुतेक गावांत सकाळपासूनच चिकन, मटण खाणा-या शौकिनांनी मोठ्या प्रमाणावर नववर्षाच्या स्वागतासाठी घरगुती आणि शेतीवर पार्ट्या करण्यासाठी या दुकानांवर खरेदी करण्यासाठी गर्दी केली होतीण मासळी बाजारातही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचे मच्छी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
याउलट अंड्याचे बाजार भाव वाढल्याने अंडी प्रती डझन ९० रुपये प्रमाणे विक्री झाल्याचे दिसून आले. सायंकाळी हॉटेलमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी जाणवली.
३१ डिसेंबरची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती कळंब येथील धाब्याचे उद्योजक नितीन भालेराव, सचिन भालेराव, निलेश भालेराव,आप्पाचा धाब्याचे उद्योजक सोमनाथ भालेराव तसेच एकलहरे येथील मांसाहारी हॉटेल व्यावसायिक संतोष डोके, अर्जुन डोके, निलेश डोके, संदेश गाडे यांनी दिली.