लोणावळा – रविवारी ३१ डिसेंबरच्या वर्षाअखेरीस लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या तब्बल २५० वाहनचालक आणि वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ७२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. तर तीन जणांच्या विरोधात ड्रिंक एंड ड्राइवची कारवाई करण्यात आली. याशिवाय आदल्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी ११२ वाहनांवर ८८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आईपीएस सत्यसाई कार्तिक आणि पोलीस निरीक्षक सीताराम डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर वाहतूक पोलीस पथकाने ही कारवाई केली. पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्ग या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
बहुतांश पर्यटकांनी हॉटेल्स तसेच बुक केलेल्या खाजगी बंगल्याच्या आवारात नवीन वर्षाचे स्वागत केले. मात्र यातील काही पर्यटक विनाकारण वाहतुकीला अडथळा ठरेल किंवा वाहतूक नियमांची पायमल्ली होईल, अशा पध्दतीने आपली वाहने रस्त्यावर फिरवत होती.
वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करणे, पोलिसांचा इशारा न मानणं, दुचाकी वरून ट्रिपल सीट फिरणं तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात प्रामुख्याने कारवाई करण्यात आली. लोणावळा शहर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार सुरेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अनिल शिंदे, सचिन कडाळे, पोलीस शिपाई अमोल फाळके तसेच होमगार्ड तुषार घाडगे, ट्राफिक वॉर्डन नितेश पडवळ, अमर मोरे, अमर साबळे, शुभम महाडिक, सिद्धेश्वर चिंचोले, अनिल शिळवणे, निखिल कदम, विशाल दातीर यांच्या पथकाने या कारवाई केली. लोणावळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि पोलीस मित्रांनी वाहतूक नियोजन करण्यात वाहतूक पोलिसांना मदत केली.