खासदार सुप्रिया सुळे ः इंदापूर येथे आक्रोश मोर्चात सरकारवर घणाघात
इंदापूर : सध्याचे राज्य सरकार हे स्वार्थी आहे. घर फोडा, पक्ष फोडा आमचे सरकार आल्यावर अन्याय झालेल्या शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करणार. आणी अंगणवाडी महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व पूर्ण करणार, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दिला.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे इंदापूर येथे गेल्या काही दिवसापासून तीव्र आंदोलन सुरू आहे, शुक्रवार (दि. 29) या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच मित्र पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इंदापूर पंचायत समिती येथे भेट दिली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, सरकारने हट्टीपणा सोडावा, दुधाला भाव नाही, कांद्याला हमी भाव नाही; परंतु भलं कॉन्ट्रॅक्टरचे होत आहे. ही कॉन्ट्रॅक्टदारी घालवायचे आहे. खासदार अमोल कोल्हे आणि मी जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी महिलांच्या संदर्भातील निर्णय घेतला नाही तर तीन तारखेला या महिलांसोबत आंदोलनात राहील, अशी ही माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. महाराष्ट्राच्या सरकारचा धिक्कार असो. ट्रिपल इंजिन खोके सरकारचा धिक्कार असो, या घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे दिल्या व अंगणवाडी कर्मचारी महिलांनी या घोषणेला साथ देत इंदापूर पंचायत समितीचा परिसर दणाणून सोडला. राज्य सरकार हे पन्नास खोक्याचे बनलेले आहे, अडीच हजार कोटी 50 आमदार फोडण्यासाठी या सरकारचे खर्च झाले. जर एवढी रक्कम अंगणवाडीच्या महिलांना दिली असती तर त्यांचे आमदार सर्व निवडून आले असते.
तर इंदापूरच्या भगिनी झाशीची राणी होतील
इंदापुरातून सुरू झालेला आवाज मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचवणार आहे. राज्य सरकार जे झोपी गेल्याचे सोंग घेत आहे. हे सरकार आपणास हद्दपार करायचे आहे. आजच मी तातडीने मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहे. आमच्या महिला भगिनी अडचणीत आहेत. महिलांचे नेतृत्व आणि त्यांचे मातृत्व आम्हाला हवे आहे. त्यामुळे त्यांचा मार्ग काढा. यासाठी चर्चा करणार आणि जर मार्ग काढला नाही तर, इंदापूरची महिला भगिनी झाशीची राणी होईल हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा खासदार सुळे यांनी दिला.