5 नोव्हेंबर रोजी मतदान : शिरूर तालुक्यात धूमशान
सविंदणे – शिरूर तालुक्यातील आठ बड्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दिवाळीपूर्वी ही निवडणुक होणार आहे. त्यामुळे मतदारांची चांगली दिवाळी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
शिरूर तालुक्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तरडोबाचीवाडी व कर्डेलवाडी या आठ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सर्व ग्रामपंचायतींची सरपंच निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने निवडणुकीला सुरवात होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी मतदान तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
ग्रामपंचायती व सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे ः रांजणगाव गणपती- अनुसूचित जाती महिला, शिरूर ग्रामीण अनुसूचित जमाती महिला वाजेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रांजणगाव सांडस – सर्वसाधारण महिला, सरदवाडी – अनुसूचित जाती महिला, अण्णापूर- अनुसूचित जमाती महिला, तर्डोबाचीवाडी – सर्वसाधारण, कर्डेलवाडी – सर्वसाधारण महिला.
आठ गावात पोटनिवडणुकाही होणार
शिरूर तालुक्यातील कारेगाव, पिंपरी दुमाला, खैरेवाडी, वाडा पुनर्वसन, काठापूर खुर्द, आपटी, सणसवाडी व कवठे येमाई या आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होणार आहेत.