पुणे – उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात मुक्काम ठोकलेल्या पाच बड्या कैद्यांची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली. यामध्ये माजी आमदार अनिल भोसले आणि गुंड रूपेश मारणेचा समावेश आहे.
ससून हॉस्पिटल ड्रग्ज प्रकरण आणि त्यात सहभागी ससूनच्या वॉर्ड नंबर 16 मध्ये न्यायालयीन कैदी असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा सहभाग पुढे आला. यानंतर दैनिक “प्रभात’ने सर्वप्रथम “वॉर्ड क्रमांक 16, संशयाच्या भोवऱ्यात’ अशी वृत्तमालिका दिली. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांच्या आदेशाने ससून प्रशासनाने त्रिसदस्यीय कैदी उपचार समिती नेमली. या समितीला 24 तासांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार समितीने विभागीय आयुक्तांना अहवाल सोपवला.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार अनिल भोसले, गुंड रूपेश मारणे, बलात्कारातील आरोपी हेमंत पाटील, प्रवीण राऊत आणि प्रकाश चावला अशा पाच कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. हे कैदी मागील तीन ते चार महिने ससूनमध्ये दाखल होते. यातील अनिल भोसले आणि रूपेश मारणे वॉर्ड नंबर 16 मध्ये दाखल होते.’ तर, ससूनच्या भेटीदरम्यान विभागीय आयुक्तांनी वॉर्ड नंबर 16 ची झाडाझडती घेतली होती.
तेव्हा वॉर्ड नंबर सोळामध्ये बराच काळ उपचार घेत असलेले कैदी आढळल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, “कैदी उपचार समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. कोणत्या कैद्यांना परत पाठवण्यात आले आहे, हे सांगता येणार नाही. ही गोपनीय बाब आहे.’ दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ललित पाटीलप्रकरणी दहा पथके वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत.
ललितचा शोध घेण्याला आमचे प्राधान्य आहे. त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्यावर त्याच्या शस्त्रक्रियेची घाई करण्याची गरज नव्हती. त्याचा शोध लागल्यावर त्याच्या पलायनास सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.