वीसगाव खोऱ्यात भाविक विठ्ठलनामात तल्लीन
वीसगाव खोरे –वीसगाव खोरे (ता. भोर) येथील ग्रामीण भागात हरीनामाच्या गजरात काकड आरतीचे सूर कानी पडू लागले आहेत.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकड आरती केली जात आहे. महिनाभर ग्रामीण भागातील भाविक पहाटे मंदिरात जमून पांडुरंगाचा काकडा पहाटे पाच वाजताच सुरू करीत आहेत.
ग्रामीण भागातील मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत आहे. गावातील मंदिरात भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे, ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी या देवतांच्या मुखास लोणी लावून सुगंधी उटणे लावण्यात येते. दही, दूध, साखर, मध, तूप, गरम पाणी याने देवाला स्नान घालून नैवेद्य दाखविला जातो. मंदिर परीसरात दीपप्रज्वलन केले जाते. देवाची पसायदानाने या आरतीची सांगता होते.
सात भजन मालिका
काकडा भजनाच्या सुरुवातीला देवाच्या रूपाचे अभंग म्हटले जातात. यामध्ये सात मालिका गायिल्या जातात. त्यात मंगलाचरण, अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये गायली जातात.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत पहाटे निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी काकड आरती केली जाते.
– हभप शंकर महाराज राऊत,
मठाधिपती वारकरी सेवा ट्रस्ट, धावडी (ता. भोर)