पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा असून या मेट्रो मार्गावर 23 स्टेशन असणार आहे.
या मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 8 हजार 313 कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र शासनाकडून त्यांच्या हिस्यापोटी 1 हजार 225 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीपैकी पहिल्यांदाच 410 कोटींचा निधी नुकताच पीएमआरडीएला प्राप्त झाला आहे.
हा निधी मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडील आर्थिक व्यवहार विभागकडे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आणि प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर यश आले असून पीएमआरडीएला केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मेट्रो मार्गाच्या परिसरात दररोज 14 लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर व सिव्हील कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोच्या सेवेद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा एकूण वेळ केवळ 35 मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकेल. आतापर्यंत प्रकल्पाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.
महत्त्वाचे मुद्दे…
- एकूण खर्च 8 हजार 313 कोटी
- केंद्राकडून मिळणार 1,225 कोटी
- पहिल्या हिश्श्यात 410 कोटींचा निधी
- प्रकल्पाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण
केंद्र शासनाकडून 410 कोटींचा निधी मिळाल्याने या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची गती वाढणार आहे. तसेच प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, अशा विश्वास आहे.” – राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए