साडेसहा लाखांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न ; मंचर येथे पाच जेरबंद, दोन फरार
मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. 8) घडली आहे. हे दुकान अभिजीत समदडिया यांचे असून, यश (वय 21) आणि जैना (वय 17) या त्यांच्या मुलांच्या दक्षतेमुळे आणि प्रतिकारामुळे पोलिसांनी व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळीच पाच दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. यात दोघे फरार झाले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंचर येथील अभिजीत समदडिया यांच्या उत्तम भाग्य ज्वेलर्स येथे चोरीसाठी दरोडेखोर आल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना समजली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी आले. दुकानातील 18 किलो 710 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 2 लाख 22 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी पिशव्यांमध्ये भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता; पण पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले, तर दोन चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले.
बाजारपेठेतील नागरिक, काजीपुरा येथील तरुण, तसेच परिसरातील नागरिक यांनी परिसराला वेढा घातला. गिरीश समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे. या घटनेत वैभव बाळू रोकडे (वय 2, रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके (वय 26 रा. नडे, ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे (वय 20, रा. कलगाव, ता. शहापूर), ग्यानसिंग भोला वर्मा (वय 23, रा. घोडबंदर रोड, ठाणे) आणि मोहम्मद अरमान दर्जी (वय 23, रा. नेहरूनगर, कुर्ला) यांना मुद्देमालासह पकडले आहे.
पळून गेलेल्या दोघांकडे ऐवज असण्याची शक्यता असून पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पकडण्यासाठी पथक पाठवले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस कर्मचारी तानाजी हगवणे, नंदकुमार आढारी, होमगार्ड फैजल खान, अर्जुन ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.