पिंपरी – सध्या दिवाळीची शॉपिंग सर्वत्र जोरदार सुरू आहे. वस्तू, साहित्य, कपडे ऑनलाइन माध्यमातून विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विविध वस्तूंची खरेदी केल्यावर अनेकजण मोबाइल ऍप तर, काहीजण डेबिट -क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. ऑनलाइन खरेदी करताना भरघोस सूटचा मोह अनेकांनी आवरत नाही. त्यातून सायबर गुन्हे घडत असून योग्य खबरदारी घेत नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करावी. व्यवहार करताना बॅंक खाते क्रमांक, पासवर्ड आणि डेबिट- क्रेडिट कार्डचा तपशील न देता खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
सणांच्या काळात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन सेल पाहायला मिळतात. बाजारात प्रत्यक्षात जाऊन साहित्य, वस्तू आणि कपड्यांची खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नागरिकांच्या याच सवयीचा सायबर गुन्हेगार फायदा घेत आहेत. विविध कंपन्याचे बनावट संकेतस्थळ तयार करीत त्यावर स्वत:चा क्रमांक देत आहेत.
वस्तूचा दर्जा, तसेच सेवा पुरविण्यासंदर्भात नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर सेवा देणे, तसेच रक्कम पुन्हा बॅंक खात्यात जमा करण्याच्या बहाण्याने बॅंक खाते तसेच डेबिट, क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत बॅंक खात्यातून रक्कम काढून घेण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. फसवणूक करणारे ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना स्वस्त वस्तूंचे आमिष दाखवतात आणि फसवणूक करतात. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही संशयास्पद लिंक, ऑफर इत्यादींच्या जाळ्यात अडकणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे.
ही घ्या काळजी
अनेकदा बाजार भावापेक्षा ऑनलाइन शॉपिंग साइटवर वस्तू स्वस्त मिळतात. त्यामुळे किंमत कमी दिसली की आपण त्या चटकन मागवतो. अनेकदा सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरी अर्थात वस्तू मिळाल्यावर पैसे देण्याची सुविधा असतो. त्यामुळे घाईघाईत वस्तू मागवल्या जातात. त्यानंतर ती वस्तू हवी तशी मिळत नाही. तसेच रंग बदलले असतात. वस्तूचा दर्जाही अनेकदा सुमार असतो. त्यामुळे पैसे वाया जातात. अशा वेळी कोणत्याही वस्तूची ऑनलाइन खरेदी करताना काळजी घ्यावी.