पिंपरी – महापालिकेचे शहरातील 172 व्यापारी गाळे हे सध्या धूळखात पडून आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 53 गाळे हे भोसरीतील व्यापारी संकुलात आहेत. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हे गाळे असल्याने त्याला मागणी नसल्याचे महापालिका भूमी आणि जिंदगी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात 946 व्यापारी गाळे उभारले आहेत. त्यापैकी 187 गाळ्यांचा वापर महापालिकेमार्फत केला जात आहे. 392 गाळ्यांचे लीज डीड तत्त्वावर वितरण करण्यात आले आहेत. तर, दरमहा भाडेतत्त्वावर 194 गाळे देण्यात आले आहेत. तथापि, 172 गाळे रिक्त असून त्यांचे वितरण झालेले नाही. प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वानेदेखील गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
व्यापारी गाळ्यांचे नागरिकांच्या मागणीनुसार 5 ते 10 वर्षांसाठी लीझ डीड केले जाते. त्यासाठी एक रकमी 3 ते 10 लाख रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. 2022-23 या आर्थिक वर्षांत भूमी आणि जिंदगी विभागाला गाळ्यांच्या भाड्यातून सर्वाधिक म्हणजे 3 कोटी 43 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षांत 172 गाळे भाड्याने गेले असते तर पालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडली असती.
शासकीय दराने मागेल त्याला गाळा यानुसार गाळे वितरित करण्यात येत आहे. याच अनुषंगाने रिक्त असलेल्या 172 व्यापारी गाळ्यांचे वितरण करण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. भोसरी येथे सर्वाधिक 53 शिल्लक असून याठिकाणी काही समस्या होत्या. त्या समस्या निराकरण करण्याचे काम सुरू आहे.
– विजय सरनाईक, सहाय्यक आयुक्त, भूमी आणि जिंदगी विभाग