तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पारखे : सहसंचालक डॉ. बोरकर यांची शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रास भेट
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील सर्व 11 प्राथमिकआरोग्य केंद्र आणि 57 उपकेंद्रांमध्ये आरोग्य मेळावे घेतले यामध्ये 2949 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 559 नागरिकांना आभाकार्ड वाटप तर 77 नागरिकांचे आयुष्यमानकार्ड तयार करण्यात आले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.
शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्यमान भव आरोग्य मेळावा घेण्यात आला यामध्ये संसर्गजन्य आजारांसाठी निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याची सुरुवात आरोग्य सहसंचालक डॉ. सुभाष बोरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली, त्यावेळी डॉ. पाखरे बोलत होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आरोग्य शिबिरास आरोग्य सहसंचालक डॉ. सुभाष बोरकर यांनी भेट दिली. त्यांनी आशा स्वयंसेविका सोबत संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषद अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक गणेश जगताप,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी सुधाकर म्हंकाळे, मीनाक्षी पिंगळे घोसाळकर, आशा नवगिरे, ज्येष्ठ नागरिक अंकुश दौंडकर, खेड तालुका आशा समूह संघटक निलेश बेलवटे, डॉ. साईनाथ मानकरी, ज्ञानेश्वर आढाव, ज्योती रणदिवे, छाया इंगळे, कुंदा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दौंडकर यांच्यासह नागरिक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आयुष्यमान भव आरोग्य मेळावा उत्साहात
करंजविहिरे, पाईट, वेताळे, कडुस, निघोजे, गुळाणी, चिंबळी, कुरुळी, पाळु, सुपे अशा आणि सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये उत्साहाने मेळावा पार पडला. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय दराडे यांच्या पथकाने करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पाहणी केली.