डॉ. प्राची सुतार : ओतूरमध्ये उमेद बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन
ओतूर – स्त्रीचे आरोग्य टिकवून ठेवण्याची त्रिसूत्री म्हणजे आहार, व्यायाम आणि विचार. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार. आपली प्रगती कशी होईल इथे लक्ष द्यावे, तसेच इतरांसाठी आपण किती सुखकारक परिस्थिती निर्माण करू शकतो हे पाहिल्यास वयाचा विसर पडून आलेल्या वा येणार्या रजोनिवृत्तीस सकारात्मक पद्धतीने स्वीकारता येईल, असे प्रतिपादन डॉ. प्राची सुतार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन प्रगती अभियान अंतर्गत उमेद महिला बचत गट बाबाजी चैतन्य ग्रामसंघ व कपादिकेश्वर ग्रामसंघ ओतूर आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यालयाचे उद्घाटन व हळदी-कुंकू समारंभ विशेष महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरा झाला, त्यावेळी महिलांचे आरोग्य मानसिक संतुलन याविषयी डॉ. सुतार यांनी मार्गदर्शन केले.
याप्रंगी सरपंच प्रा. डॉ. छाया तांबे, डॉ. प्राची सुतार व प्रभाग समन्वयक रवींद्र आल्हाट या मान्यवरांच्या हस्ते ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक महिला देणगीदार, साईकृपा महिला बचत गट व संजीवनी तांबे यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र आल्हाट यांनी बचत गटाच्या योजना उपक्रम प्रशिक्षण याविषयी माहिती दिली.
यावेळी रेश्मा तांबे रंजना घोलप, पुष्पा या महिलांनी मनोगत व्यक्त केले. हळदी कुंकू समारंभामध्ये विधवा महिलांना प्रथम हळदीकुंकू मान देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन बचत गटाच्या उज्ज्वला माळवे, अश्विनी डुंबरे, रुपाली डुंबरे, रोहिणी खरात, नम्रता सुतार, सुचिता इसकांडे, मनीषा तांबे, दिपाली तांबे आदी महिलांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना शीरसाठ यांनी तर प्रेरणा तांबे यांनी आभार मानले.
होममिस्टरमधील पैठणीच्या मानकरी
रेश्मा तांबे (प्रथम), निशा तांबे (द्वितीय), सुप्रिया बेल्हेकर (तृतीय), माया ढमाले (चतुर्थ), स्मिता ढमाले (पाचवा). ज्येष्ठांमध्ये रत्ना शिरसाट व रत्नाबाई कवडे तर युवतींमध्ये आदिती ढमाले यांनी क्रमांक पटकाविला.