थंडीमुळे 25 टक्के उत्पादनात घटणार – शेतकरी भोर
नारायणगाव – पोषक वातावरण नसतानाही हिवरे तर्फे नारायणगाव अनंत मारुती भोर शेतकर्याने असूनही दोन एकर काकडीची लागवडीचा प्रयोग केला असून थंडीमुळे 25 टक्के उत्पादन घटणार असल्याचे शेतकर्याने सांगितले.
अनंत भोर या शेतकर्याने 10 नोव्हेंबर 2023 रोजी दोन एकर क्षेत्रात प्रभू नेत्रा सीड्स जातीच्या काकडीची लागवड केली असून काकडीची लागवड करताना दोन सर्यांमध्ये साडेचार फूटाचे तर दोन झाडांमध्ये सव्वा फूट अंतर ठेवले. तर काकडीची लागवड करताना मल्चिंग पेपर व ड्रीपचा वापर केला आहे. थंडीच्या दिवसात फळधारणा कमी होत असून त्यावर डाऊनी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
परिणामी खर्चात वाढ होऊन उत्पादनात 25 टक्के घट झाली आहे. सध्या बाजारात काकडीची सरासरी 15 ते 30 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. भोर यांना दोन एकर क्षेत्रात एकूण 40 हजार किलो उत्पादन होण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात काकडी उत्पादनात घट होऊन एकरी 18 ते 20 टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. परंतु इतर ऋतूत काकडीचे एकरी उत्पादन 25 टन मिळाले असते. याचाच अर्थ थंडीच्या दिवसात 25 टक्के उत्पादनात घट होणार आहे. वातावरणानुसार विद्राव्य खतांचा ड्रीपच्या साह्याने आवश्यकतेनुसार वापर करावा लागत आहे. काकडीच्या रोपांची लागवड केल्यानंतर पुढील 30 दिवसात तर बी लागवड केल्यानंतर 40 दिवसात उत्पादन सुरू होते. उत्पादन सुरू झाल्यापासून पहिल्या आठ दिवस रोज 500 किलो काकडी निघत असून पुढील 20 दिवस दर दिवशी एक टन माल निघेल
सर्व मिळून दोन लाख खर्च येणार
काकडीच्या एका रोपाची किंमत 1.40 पैसे असून एकरी साडेआठ ते नऊ हजार रोपांची लागवड करावी लागते. मल्चिंग पेपर, खते, औषधे यांचा एकरी पन्नास हजार रुपये खर्च आला असून रोपांचा सतरा हजार रुपये खर्च आला आहे. उत्पादन चालू होईपर्यंत एकूण खर्च 70 ते 80 हजार रुपये आला आहे. काकडी लागवडीपासून विक्रीपर्यंत वाहतुकीसह 2 लाख खर्च येणार आहे.
हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) : येथील अनंत भोर यांनी पोषक वातावरण नसतानाही काकडीचे पीक घेतले आहे.