पुणे : मिळकतकर थकबाकी असलेल्या सुमारे २०० मिळकतींचा महापालिकेकडून लिलाव करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० मिळकतींवर बोजा चढविण्यात आला असून शासनमान्य मुल्यांकनकर्त्यांकडून या मिळकतींचे मुल्य निश्चित करण्यात येत असून पुढील आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी ही माहिती दिली.
महापालिकेकडून या मिळकतीचे मुल्यांकन निश्चित करण्याचे काम पालिकेच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आले होते. मात्र, बांधकाम विभागाने त्यास नकार दिल्याने या प्रक्रीयेस उशीर झाला असून आता ही प्रक्रीया २० जानेवारी पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. महापालिकेच्या मिळकतकराची सुमारे ५४ कोटींची थकबाकी असलेल्या सुमारे २०२ व्यावसायिक मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया पालिकेने तीन महिन्यांपूर्वी सुरू केली असली तरी कर विभागालाच अनेक अडथळयांचा सामना करावा लागत असल्याने ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.