भोर -भोर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. जमिनीच्या मोजणीत मूळ नकाशात बदल करून शेतकऱ्यांमध्ये तंटा वाढविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. भूमापकांच्या कामामुळे भोर तालुक्यांतील शेतकरी हैराण झाले आहेत. भोर कार्यालयातील मनमानी कारभाराची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून कामचुकार कर्मचाऱ्यांववर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना हाताशी धरून अधिकारी काम करीत आहेत. शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर सहा-सहा महिने मोजणीची प्रकरणे धूळखात पडलेली असतात. मात्र, मध्यस्थांच्या सल्ल्यानंतर मोजणीची प्रकरणे हाती घेतली जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.
ज्या शेतकऱ्याने बिदागी दिली आहे. अशा शेतकऱ्याच्या जमिनीचा कार्यालयाकडील क्षेत्राचा नकाशा विचारात न घेता जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्राचा विचार न करता मोजणीचा दिखावा करून नकाशा दिला जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिला आहे. काही प्रकरणात तक्रारी उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्यांची सुनावणी ठेवली जाते. मात्र, सुनावणीत संबंधित शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येत आहे.
वादाच्या प्रकरणात सुनावणी घेऊन दोन्ही शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय दिला जातो. निर्णयाचे पालन न झाल्यास कारवाई केली जाते. कोणावर अन्याय होऊ नये, सरकारकडील जमिनीच्या नकाशाप्रमाणे व सातबारा उताऱ्यावारील नोंदीप्रमाणे क्षेत्र भरले पाहिजे हे मान्य आहे. ते भरत नसेल तर भूमापकाने केलेली मोजणी चुकीची असल्यास त्यावर कारवाई केली जाते.
– डॉ. विजयकुमार कोरे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, भोर.
खासगी मोजणीधारकांचा सुळसुळाट
सध्या भोरमध्ये खासगी क्षेत्राची मोजणी करणाऱ्यांचे पीक फोफावले आहे. यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद निर्माण होत आहेत. प्रॉपर्टी कार्डच्या प्रकरणातही सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही संबंधितांस ते न देता आणि याविषयी तक्रार अर्ज असल्याची बतावणी करून प्रॉपर्टी कार्ड देणाऱ्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.