राजगुरूनगर – गणेशोत्सवाची लगबग संपल्यानंतर आता येत्या 14 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण बैलपोळा असल्याने बैलाच्या मूर्ती तयार करण्यात खेडमधील कुंभार बांधव सरसावले आहेत. बैलांची जागा यंत्रांनी घेतली असली तरी बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबात मनात घर करून आहे, म्हणूनच जिवंत बैल नसला तरी मातीचा बैल करून त्याची मनोभावे पूजा करीत हा सण साजरा होत असतो.
बैलपोळा सणाचे औचित्य साधून शहरातील हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ परीसरातील गेली पिढ्यानपिढ्या मातीला आकार देणारे कुंभार समाज आता मातीचे तसेच प्लॅस्टर पॅरीसच्या सहाय्याने बैल, घोडे, दिवाळी सुट्टीतील किल्ल्यांसाठी शिवाजी संभाजी महाराज, सरदार, मावळे यांच्या विविध आकारातील सुबक मूर्ती बनविण्यात मग्न आहेत.
राजगुरूनगर शहरातील 30-35 कुंटुबे सध्या बैलांच्या, घोडी विविध आकारातील मूर्ती घडवण्यात दंग झाला आहे. कुंभार समाजातील महिलांसह मुले सध्या बैलांच्या रंगरंगोटीवर शेवटचा हात मारत आहे. तर राजगुरुनगर, पुणे, मुंबई आदि शहरातील व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार विविध उंचीतील बैल जोड्या घोडी रवाना करण्यास सुरुवात झाली आहे.
देवींच्या मूर्तींनाही मागणी
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. गावागावात असलेल्या नवरात्री उत्सवात देवीची मूर्ती बसविल्या जातात देवीच्या मूर्तीला मोठी मागणी असते. देवीच्या मूर्ती बनवून त्याला रंगरंगोटी करून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. आकर्षक सुबक आणि विविध रंगभूषा, असलेल्या सुबक मूर्तींना मोठी मागणी असते.
“मातीचा वापर करण्यात आमची जुनी पिढी कलाकुसर करत विविध सणानुसार मुर्ती, पंत्या, गाडु, माठ, आदि बनविण्यासाठी वेळ आणि पावसाळ्यात ऊन नसल्यामुळे वाळण्यासाठी कालावधी मोठा जात होता. अलिकडच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरीस मुळे विविध आकाराच्या साच्यात भरल्यानंतर मुर्ती सुकण्यास दोन दिवस लागत असल्यामुळे मागणीनुसार मुर्ती पुरवठा करणे शक्य झाले असुन आमच्या कुंभार समाजातील विविध सणानुसार लागणा-या देवदेवतासह दिवाळीत किल्ले, मावळे, बैल, पणत्या, मडकी, गाडू, आदि पुरवणे शक्य होत आहे.” -राजू कुंभार, मूर्तिकार राजगुरूनगर
“गेल्या वर्षीपेक्षा यंदा कलर आणि प्लॅंस्टर पॅंरीसच्या भावात वाढ झाल्याने यंदा बैलजोडी किमंत 30-40 टक्यांनी वाढ झाली आहे. सर्वसाधारण सर्वात लहान बैलजोडी 30 रुपयांपासून अडीच तीन हजारापर्यंत बोलजोडी किंमत आहे. मागणीनुसार व्यापारी महिनाभर अगोदर बैलाची आकार, उंची, आणि विविध रंगरुपानुसार नोंदणी बुक करुन त्याप्रमाणे बैलांच्या मुर्ती बनवण्यास गणेशोत्सवानंतर लगेच सुरुवात करत असतो.”- शरद कुंभार, मूर्तिकार राजगुरूनगर