नीरा – नीरा (ता. पुरंदर ) येथे मंगळवारी दुपारी नीरा येथील पोलीस चौकीत रुजू असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकी वाहने लोणंद बाजूकडून येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरून धडक दिली. यामध्ये कर्मचाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले, असताना स्वतःची चूक असल्याने टेम्पो चालकांला जाऊ देण्यात आले. मात्र, नंतर याच टेम्पो चालकला सापळा रचून पुन्हा अडवले. यानंतर कोणताही गुन्हा दखल न करताच त्याला सोडून देण्यात आले. त्यामुळे यात नक्की झाले काय, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारात आहेत. दिवसभर नीरा शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
मंगळवारी सायंकाळी पोलीस कर्मचारी राजेंद्र भापकर हे लोणंदकडे आपल्या सातारा पासिंग असलेल्या क्वीड कारने चालले होते. त्यांनी लोणंदकडून येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरून उलट दिशेने धडक दिली. त्यानंतर त्यांना नीरा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी कारमधून बाहेर काढले. मात्र, भापकर हे मद्यधुंद असल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
अपघाताच्या आवाजाने रस्त्याच्या कडेच्या दुकानातील व्यावसायिक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन ओळखून मदतीसाठी धावून गेले. पण मद्यधुंद कर्मचाऱ्याची अवस्था पाहून तेही आवाक झाले. सोबत गाडीत असलेला एक व्यक्तीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
टेम्पो व कार धडकेनंतर दोन्ही वाहनातील कोणी जखमी झाले नसल्याने व पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन उलट दिशेला असल्याने टेम्पो चालकाला जाऊन दिले. काही वेळाने नीरा पोलिसांनी तो टेम्पो वाल्हा हद्दीत अडवून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. चालकाला दमदाटी करीत कारची नुकसानभरपाई घेण्यात आली. मात्र, कोणताही गुन्हा दखल करण्यात आला नाही. टेम्पो चालकाकडून नुकसान भरपाईपोटी मोठी वसुली करण्यात आल्याची चर्चा बुधवारी नीरा शहरात दिवसभर सुरू होती.
खाकी वर्दीची ही अवस्था
जेजुरी पोलीस स्टेशन अंकित नीरा पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यावर यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई केली होती. कायम डोळ्यांवर काळा गॉगल असणारे, त्यांचा शीघ्रकोपी स्वभाव व व्यसनाधीनता यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. कोविड काळात एका डॉक्टरांना त्यांनी बेदम मारहाण केली होती. ते कामावर असताना पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची बडदास्त ठेवली जाते.