देऊळगावराजे येथील शाळेला भेट : संवाद साधला
देऊळगाव राजे – पुणे जिल्हा परिषदेला नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी देऊळगावराजे येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिलीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्याचा चक्क तास घेतला.
यावेळी शब्द वाचन, अंक गणित, बेरीज वजाबाकी हे विद्यार्थांना विचारले, विद्यार्थांनी देखील न घाबरता सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक दिल्याने अधिकारी मात्र समाधानी झाले. मोठे अधिकारी शाळेत येण्याची ही पहिली वेळ असेल, पहिलीच्या आणि तिसरीच्या वर्गात चव्हाण यांनी विविध विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी देखील त्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
शाळेचा परिसर क्रीडांगण परिसरात असलेली झाडे संगणक रूम बालोद्यान हे सगळे पाहून जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, ग्रामसेवक अमीर शेख, सरपंच स्वाती गिरमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा गिरमकर, केंद्रप्रमुख वैशाली जानराव, मुख्याध्यापक सुरेश गिरमे, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.