पुणे – चाकरमान्यांसाठी सुरू केलेली पुणे-दौंड-बारामती रेल्वे पॅसेंजर नेहमीच उशिराने धावते. कधीतरी वेळेत जाऊ द्या, असा संतप्त प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढवा, अन्यथा पुणे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांकडून देण्यात आला.
पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा नसल्यामुळे मोजक्याच ट्रेन पुणे – दौंड दरम्यान धावतात. मात्र, त्याही कधीच वेळेत धावल्या नाही. 01531 पुणे-दौंड-बारामती रेल्वे पॅसेंजर ही रोजच उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक आणि वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक पुणे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवासी ग्रुपकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारीही बारामती पॅसेंजरला उशीर झाला. त्याबाबत पुणे ग्रामीण प्रवासी वर्गाने पुणे स्टेशन येथील उप-प्रबंधक यांच्याकडे जाब विचारण्यासाठी किमान शंभरहून अधिक प्रवासी गेले असता, कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. ही बाब वारंवार घडते, काहीवेळेस आर.पी.एफ. बोलावून प्रवाशांना जबरदस्तीने बाहेर काढले जाते. त्यामुळे नक्कीच दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.