पिस्तुल घेऊन फिरणारा एकजण जेरबंद
शिक्रापूर – केंदूर (ता. शिरुर) येथे २०२१ मध्ये युवकाचा खून केल्याने खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर येताच युवकाने कारमधून पिस्तुल घेऊन फिरत असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्याला कार व पिस्तुलसह अटक केली.
बबलू ऊर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड (वय २५, रा. पऱ्हाडवाडी केंदूर), असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. केंदूर येथे पऱ्हाड याने डिसेंबर २०२१ मध्ये जुन्या वादातून पप्पू ऊर्फ निलेश विष्णू पऱ्हाड याचा खून केला होता.
दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली तर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या न्यायालयाने बबलूला जामिनावर सोडले होते. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर बबलू हा पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे आदींनी केंदूर येथील पऱ्हाडवाडी येथे सापळा रचून बबलू ऊर्फ अभिजित याला कार व पिस्तुलसह जेरबंद केले. याबाबत पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करीत आहेत.