माणिकराव झेंडे पाटील : सासवड येथे पुरंदर राष्ट्रवादीकडून आंदोलन
सासवड – भाजपाने ईडी, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. एक युवक चेहरा म्हणून शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार राहिले. शरद पवारांचे विचार संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात आली. या संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे शासनाने त्यांच्यावर ईडीचे कारवाई केली असल्याचा घाण्णाघात राष्ट्रवादी काँग्रेसचेे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी केला आहे.
सासवड (ता पुरंदर) येथे आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणार्या चौकशीच्या विरोधात पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर तहसील कार्यालयावर आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी झेंडे बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, बबुसाहेब माहुरकर, बाळासाहेब भिंताडे, राष्ट्रवादी गौरी कुंजीर, पुष्कराज जाधव, अमोल कामठे, बंडूकाका जगताप, युवराज जगताप, प्रदीप खळदकर, महेश बारटक्के, वामन कामठे, अंकुश परखंडे, राजू क्षीरसागर, दीपक टकले, राहुल कटके, हनुमंत पवार, कलाताई फरतडे, संदीप जगताप, गोरख शेंडकर, उपस्थित होते.
पुष्कराज जाधव म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव रोहित पवार हे आहे, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे आमदार रोहित पवार हे ही शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारासाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती कारवाई अन्यायकारक आहे.
– बाळासाहेब भिंताडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) सासवड शहर