नीरा -नीरा (ता. पुरंदर) येथील प्रमुख बाजापेठेच्या शहरांसह ग्रामीण भागातही शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. प्रमुख राजकीय पक्षांचा या आंदोलनात सहभाग पाहायला मिळाला नाही.
नीरा (ता. पुरंदर) शहरात सोमवारी (दि. 7) रात्री उशिरा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारत बंदला व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला नीरेकर व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळ पासुनच प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला.
बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत दिवसभर आपली आस्थापने बंद ठेवली. हॉटेल, स्विटमार्ट, कापड व्यावसायिक, किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स दुकानांसह चहाची टपरी, देशी-विदेशी मद्यालय संपूर्ण दिवसभर बंद होती.
भारत बंद आंदोलनाबाबत कोणता राजकीय पक्ष प्रमुख भूमिका घेतो याकडे सोमवारी (दि. 7) रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते. नीरेतील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी कोणी ही बंदमध्ये सहभागी होण्याबाबत व्यापाऱ्यांना आवाहन केले नाही.
रात्री उशिरा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने व्यापाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या नंतर व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र कोणत्याच राजकीय पक्षाने शेतकऱ्यांची बाजू लावून न धरल्याने स्थानिक पक्ष नेत्यांबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.