पिंपरी – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन हे काही खऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. त्या आंदोलनामध्ये तीनशे, चारशे रुपये रोजाने लोक आणले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला काही अर्थ नाही, असे खिल्ली उडविणारे वक्तव्य पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिका सभेत केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची सभा आज महापालिका सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सभा तहकूब करण्याची मागणी केली. यावर बोलताना उपमहापौर केशव घोळवे यांनी शेतकरी आंदोलनावरच टीका केली.
उपमहापौर घोळवे म्हणाले, अनेक दिवस शेतकऱ्यांच्या हिताचा कोणी विचार केला नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे विधेयक आणले आहे. शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाने जगभरात विकला गेला पाहिजे यासाठी हे कायदे महत्त्वाचे आहेत. मात्र काही एजेंट मंडळी चांगल्या कामांना केवळ विरोध करायचा म्हणून शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलक आंदोलन करत आहेत त्यांना चीन आणि पाकिस्तानमधून रसद येत आहे का?. हे आंदोलक खरे शेतकरी नाही. तर हे दलालांनी भाड्याने आणलेली लोक आहेत. त्यांना तीनशे-चारशे रुपये ठरवले आहेत. ते ही त्यांना वेळेत दिले जात नाहीत.
मिळाला घरचा आहेर
या वक्तव्यावर भाजपने त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सोबतच स्वपक्षीय नगरसेविकेकडून घरचा आहेर देखील मिळाला. नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, केशव घोळवे हे अत्यंत भावनिक आहेत. त्यांच्या तोंडून भावनेच्या आहारी हे शब्द गेले आहेत. हे शब्द सभा कामकाजामधून वगळण्यात यावे. मात्र अशाप्रकारे कोणत्याही आंदोलनाची खिल्ली उडवणे चूक असल्याचेही त्यांनी सांगितले.