भुजंगराव दाभाडे
भोर -भोर तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून भरमसाठ व्याजावर पैसे देऊन सावकारी धंदा सुरु आहे. व्याजाची रक्कम फेडण्यासाठी अनेकांची घरे,शेतजमीन बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सावकारांनी गिळकृंत करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. भोर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भोर पोलीस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही. कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे सावकारांना अभय मिळत आहे. सावकारांवर कोणाचाच अंकुश नसल्याने भोर शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस सावकारीचा धंदा फोफवला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
करोनामुळे आठ ते नऊ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडल्यामुळे तरूणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काम धंदा नसल्यामुळे लग्न कार्यासह इतर कामांसाठी पैशाची चणचण भासत असल्याने अनेकजण सावकारांच्या जाळयात अडकले आहेत. याचाच गैरफायदा घेत 5 टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यत सावकारांच्या मनाला येईल तितके व्याज आकारले जात आहे. कर्ज देऊन घरे, शेतजमिन लिहून घेतले जात आहे.
व्याज वाढत गेल्यावर व्याज दुप्पट, तीनपट, चारपट झाल्यावर आपोआप कमी पैशांत व्याजावरच घर, जमीन नावावर करण्याचा सपाटा सावकारांनी लावला आहे. सावकारीच्या विळख्यातून सर्वसामान्य बाहेर पडू शकत नाहीत. दोन वर्षांत भोर शहरात आणि ग्रामीण भागात सावकारीत वाढ होत आहे. व्याजाचे पैसे वसुलीसाठी काही टोळ्या (वसुली पथके) काम करीत आहे. लोकांना धमकावून पैसे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत भोर पोलिसात एकही तक्रार दाखल नाही, याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अवैध सावकारी करणारे आणि व्याजाच्या पैशाच्या वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भोर यांच्याकडे करावी. संबंधीतांवर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी केले आहे. मात्र, भोर पोलीस ठाण्यात व्याजाने पैसे देऊन सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने भोर पोलिसांच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भोर शहर आणि तालुक्यात भरमसाठ व्याज आकारून पैसे देऊन घर जमीन, सोने लाटण्याचे प्रकार वाढल्याचा तक्रारी येत आहेत. याविषयी नागरिक दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.
दरम्यान, सावकाराने कर्ज देऊन लुबाडणूक केल्याबद्दल बाजारवाडी (ता. भोर) येथील संगीता नितीन सपकाळ यांनी भोर पोलिसांत (दि.31) ऑक्टोबर रोजी दिलेला आहे. सावकाराने त्यांची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. या अर्जाच्या प्रती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि उप विभागीय पोलीस अधिकारी यांना दिल्या आहेत.
सावकारांचा जाच कमी होणार काय?
भोर शहरात व तालुक्यात व्याजाने पैसे देऊन सावकारी करणाऱ्यावर कोणाचाच अंकुश नसल्यामुळे सावकारी फोफावली आहे. दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी शहरात व तालुक्यात अनेक टोळ्या दहशत पसरवित आहे. ते पैशाच्या वसुलीसाठी धमकावत असल्याचे नागरिक सांगतात. सावकारी आणि त्याचे सर्कल वाढत आहे. सर्वसामान्यावर अन्याय होत असल्याचे चित्र भयभीत करणारे आहे. सावकारांचा जाचातून लोकांना न्याय कधी मिळणार, याची चर्चा भोर तालुक्यात सुरू आहे.
बाजारवाडी येथील संगीता सपकाळ यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सखोल चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
– राजू मोरे,
पोलीस निरीक्षक, भोर.