संघर्ष समितीच्यावतीने अपर तहसीलदार शिंदे यांना निवेदन
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचे प्रतिनिधी असावेत या मागणीसह अन्य 12 मागण्याचे निवेदन भीमाशंकर संघर्ष समिती खेड, आंबेगाव यांच्या वतीने मंगळवारी (दि. 5) अपर तहसीलदार नेहा शिंदे यांना देण्यात आले.
ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचा प्रतिनिधी असावेत, भीमाशंकर मंदिरातील पिंडीवर होणारे अभिषेक बाहेर व्हावेत, भीमाशंकरच्या पूजेचा मान हा आदिवासी समाजाला आहे तो त्यांना मिळावा, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या उत्पन्नातून काही रक्कम खेड, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागाच्या विकासकामांसाठी खर्च करावी, भीमाशंकर मंदिरात झालेल्या हाणामारीचा प्रकार निंदनीय असून त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत हाणामारी करणार्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये.
मंदिर सभागृहात बसून अभिषेक करण्याच्या पावत्या करणारे टेबल मंदिर मंडपातून त्यांची बाहेर व्यवस्था करावी पिंडीचे पावित्र्य जपण्यासाठी पिंडीजवळचे दर्शन बंद करून ते दुरून दर्शन करण्याची व्यवस्था करावी भीमाशंकर देवस्थान मंदिरात स्थानिकांना नोकरी व्यवसायात प्राधान्य द्यावे, आदी मागण्या भीमाशंकर संघर्ष समिती आंबेगाव, खेड यांच्या वतीने करण्यात आल्या असून मागण्याचे निवेदन खेडच्या अपर तहसीलदार नेहा शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक जयसिंग भोगाडे, भीमाशंकर-भोरगिरीचे सरपंच दत्तात्रय हिले, संतोष भागे सामा काठे, रविंद्र दिवाळे आदी उपस्थित होते.