दौंडमध्ये आगामी निवडणुकीसाठी तिहेरी रणधुमाळी
विशाल धुमाळ
दौंड – दिल्ली आणि पंजाब राज्यातील निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी आता दौंड नगरपरिषद निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी व आम आदमी पार्टीमध्ये रणधुमाळी होण्याची शक्यता आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने दौंड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आम आदमी पक्ष दौंड शहरासह तालुक्याच्या विकासासाठी स्वबळावर लढणार असल्याचे पुणे जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत, दौंड शहर व तालुका संयोजक रवींद्र जाधव यांनी जाहीर केले. सोसायटीच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळीसुरू झाल्याने आगामी निवडणुकीत इच्छुकांनाघाम फुटणार आहे. सोसायटी निवडणुकांची धामधूम सध्या सगळीकडेच सुरू आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अनेक इच्छुकांनी आपले नशीब अजमावले आहे.
सोसायटी निवडणुकीत काहींचा विजय तर काहींचा अल्पमताने पराभव झाला आहे. सोसायटी निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी होईपर्यंत संचालक मंडळ सांभाळताना इच्छुकांची दमछाक झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोसायटी निवडणुकांच्या रणधुमाळीने गावा – गावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकांमुळे गावांमधील एकाच पक्षाचे दोन गट आमने – सामने उभे ठाकल्याने नेत्यांची दमछाक होऊ लागली आहे. याचेपडसाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतउमटणार आहेत.
दौंड शहराच्या विकासासाठी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना येथे न आणता शहरातीलच कार्यकर्त्यांना केजरीवाल बनवायचे आहे, भारतीय जनता पार्टी तसेच महाविकास आघाडी हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोघांचे राजकारण एकाच दिशेने जात आहे. त्यांचा चेहरा पाहता एकाने धर्मांधतेचा चेहरा घेतला आहे आणि एकाने तो मुखवटा घेतलेला नाही, परंतु धोरण तेच आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये हे प्रश्नच पुढे येणार नाहीत. भोंग्याचे प्रश्न निर्माण होतील, आणि सर्व चर्चा त्या दिशेला जाईल किंवा एकमेकांच्या विरोधातील सिडीवरून दमदाटीचे राजकारण महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये सध्या दिसत आहे. म्हणून आम आदमी पक्षाला यंदा संधी द्यायची आहे, असे मुकुंद किर्दत म्हणाले.
दौंड शहराच्या विकासाचा रस्ता हायवेने निघून गेला आहे. तो विकास दौंडमध्ये यायला पाहिजे, असे वाटत असल्याने शहरात आम आदमी पार्टी संघटना मजबूत करीत आहे. आगामी नगरपालिका निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार आहे.
– मुकुंद किर्दत, संयोजक, पुणे जिल्हा
अस्तित्वासाठी नेत्यांची धडपड सुरू
एकंदरीतच राजकारणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंबहुना असणारे अस्तित्व टीकविण्यासाठी नेत्यांची धडपड सतत सुरू असते. त्याचप्रकारे दौंड तालुक्यातील आमदार कुल व माजी आमदार थोरात यांचीही धडपड सुरु झाली आहे; मात्र यात आगामी निवडणुक निकालानंतरच अस्तित्व सिद्ध होईल हे मात्र निश्चित.