विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ महिला जखमी; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वाघोली – पुण्यातील केसनंद ते वाडेबोल्हाई रस्त्यावरील चिकू बन हॉटेल समोरील झाडाला सोमवारी स्कूल बस धडकून अपघात अपघात झाला आहे. अपघात होताच चालक त्या ठिकाणाहून फरार झाला. नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेवून मदत केली. बसमध्ये १४ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून अपघातामुळे बसमधील विद्यार्थी भयभीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात सोमवार (दि.४) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. दरम्यान, ही स्कूल बस द रायझिंग स्कूल या शाळेची होती. स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात घडल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.
चालक तुकाराम जनार्दन पवार हा (रा. वाघोली, पुणे) मुलांना घेऊन बस वाडेबोल्हाई-केसनंदकडे भरधाव वेगाने जात असताना चिकू वन/गारवा हॉटेल समोर बस आल्यानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने जोराची धडक झाडला दिली. यावेळी रस्त्याकडेला भाजी विक्री करणाऱ्या सीताबाई नारायण ढोरे (वय ७०) यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे.
बसमधील दोन शाळकरी मुले जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर करीत आहेत.
अपघातग्रस्त बस ही आमच्या शाळेची असून अचानक बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे
-सुनंदा वडजे, संचालिका, द रायझिंग स्कूल.