यवत – दौंड तालुक्यातील राहू येथे यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 4 गावठी पिस्तूल 1 रिव्हॉल्वर, 13 काडतूसे जप्त केली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत माहिती दिली.
दिनेश महादेव मोरे, अभिषेक उर्फ बारकू राजेंद्र शिंदे, अमोल शिवाजी नवले, सचिन शिवाजी चव्हाण, परमेश्वर दशरथ कंधारे अशी आरोपींची नावे असून, यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तब्बल 2 लाख 91हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहू परिसरात पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड आणि निलेश कदम हे पेट्रोलिंग करत असताना यांना गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली. राहू गावच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ दिनेश महादेव मोरे व अभिषेक उर्फ बारकू राजेंद्र शिंदे व त्याचे इतर तीन साथीदार बेकायदेशीर गावठी पिस्तूल जवळ बाळगत आहेत, त्यानुसार 4 गावठी पिस्टल, 1 रिव्हॉल्वर, आणि 13 काडतूसे जप्त करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाची नेमणूक
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध बेकायदेशीर शस्त्रावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.