नवी दिल्ली – सेंट्रल डिपॉझीटरी सर्व्हिसेस म्हणजे सीडीएसएल कडील डिमॅट खात्याची संख्या आता सहा कोटीवर गेली आहे. यावरून भारतामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सीडीएसएलने आपले कामकाज 1999 मध्ये सुरू केले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअरची खरेदी विक्री करता येते. या संबंधात बाजार नियंत्रक सीबीचे संचालक अनंत बरुवा यांनी सांगितले की, डिमॅट खात्यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची कुचंबना थांबली आहे. त्याचबरोबर डिमॅट पद्धतीमुळे मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरातील गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करू शकत आहेत.
त्यामुळेच गेल्या काही वर्षापासून देशातील विविध ठिकाणाहून डिमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे फक्त गुंतवणूकदारांचा नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ शेअर बाजारच नाही तर बॅंकिंग आणि इतर संस्थांनी या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्याचबरोबर डिमॅट व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी सर्व संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असते.
गेल्या अनेक वर्षांमध्ये यामध्ये मोठी अडचण आलेली नाही. सीडीएसएलचे अध्यक्ष बी व्ही चौबळ यांनी सांगितले की, मोठ्या शहराऐवजी छोट्या शहरातून डिमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
भारताची लोकसंख्या 130 कोटी पेक्षा जास्त आहे तर डिमॅट खात्याची संख्या त्या तुलनेत कितीतरी कमी आहे. त्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढण्यास आगामी काळामध्ये अमर्याद वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा विस्तार होत असून आता भारतीय शेअर बाजार जगातील पहिल्या दहा शेअरबाजारापैकी समजला जातो.