इंदापुरात श्रेयवाद उफाळला
इंदापूर – इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व हजरत चांदशाहवली बाबा दर्गाहला विकास आराखड्यास नियोजन विभागाकडून ३८ कोटींच्या निधीची मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आमदार भरणे यांनी राम-रहीम यांना सोबत घेऊन इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे गढीवरील हजरत चांदशाहवली बाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले. यावेळी शिवप्रेमी व मुस्लीम बांधवांनी आमदार भरणे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
भरणे म्हणाले की, १५ मार्च २०२३ रोजी विधान सभागृहात मी स्वतः लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर चर्चा करताना पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उत्तर देताना या गढीचे संवर्धन व हजरत चांदशाहवली बाबा दरगाह विकास करणे या संदर्भात आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांनतर दि. २० मार्च रोजी पर्यटन मंत्री यांच्या विधानभवन दालनात बैठक आयोजित केली होती.संबंधित अधिकारी तसेच वास्तु विशारद व सल्लागार यांच्याकडून या आराखड्याची माहिती व पार्श्वभूमीचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी, पुणे यांना तत्काळ आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दि. ३१ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तयार केलेला आराखडयाचे सादरीकरण झाले. पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करणेस अडचणी निर्माण होत आहेत. नियोजन विभागाकडून हा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वास्तु विशारद व सल्लागार यांची नेमणूक करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेकडून तातडीने जागा उपलब्धता व सद्यस्थितीबाबतचा व वस्तुस्थितीचा आराखडा सादर करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिलेल्या होत्या.
दि. १७ नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीची मुख्य सचिवांचे समिती कक्ष, मंत्रालय येथे बैठक झाली व या बैठकीत आरखड्यास मान्यता दिली.
२० ऑक्टोबर रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विकास समितीची बैठकीमध्ये घेण्यात आली. बैठकीमध्ये आराखड्यास मान्यता दिली. आराखडा नियोजन विभाग मंत्रालयामध्ये सादर करण्यात आल्या. तिर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकारी समितीची बैठक राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मान्यता दिली. शिखर समिती यांच्याकडे आराखडा सादर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या आराखड्यास शिखर समितीने चक्राकार पद्धतीने मान्यता दिली. मंत्रीमंडळ बैठकीस मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आली. दि. ३० नोव्हेंबर रोजी शासन नियोजन विभागाकडून या विकास आराखड्यास शासन निर्णय प्राप्त झाला. विकास आराखड्यास नियोजन विभागाकडून ३८ कोटींच्या निधीस मंजूरी दिली.
खोटे बोलणाऱ्यास चांदशाहवली बाबा बघून घेतील
वीरश्री मालोजीराजे गढी व हजरत चांदशाहवली बाबांच्या दरगाहच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार केला. अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विधानसभेत लक्षवेधी मांडली. शहरातील अनेक नागरिकांना माहिती व्हावे म्हणून त्यांना बैठकीला सोबत घेवून गेलो. एवढे कष्ट करून देखील काहीजण आम्हीच हे काम केल्याचा बेबनाव करतात. मी जर खोटे बोलत असतो तर मला एवढा त्रास झाला नसता. मात्र कामाचे फुकटचे श्रेय लाटू पाहणाऱ्यांना चांदशाहवली बाबा बघून घेतील. असे मजारवर हात ठेवून आमदार भरणे यांनी शपथ घेतली.