पुणे – विमानतळ रस्त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सच्या सीमा भिंतीलगतच्या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वार वकिलाच्या तोंडावर गोल्फचा बॉल लागला. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोळ्याखाली जखम झाली आहे. गोल्फ कोर्समधून बाहेर आलेला बॉल लागल्याने हा प्रकार घडला.
या प्रकरणी अमोल विश्वनाथ नखाते (वय ३०, रा. रहाटणी, पिंपरी-चिंचवड) यांनी गोल्फ कोर्सविरोधात येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन आणि गोल्फ खेळणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास विमानतळ रस्त्यावरील जीएसटी भवनसमोर घडला. तक्रारदार नखाते आणि त्यांचा सहकारी दुचाकीवरून चालले होते. जीएसटी भवनासमोर पूना क्लब गोल्फ कोर्स आहे.
तक्रारदार तेथून जात असताना गोल्फ कोर्समधून बाहेर आलेला बॉल तक्रारदाराच्या डोळ्याखाली लागला. त्यामुळे अंधारी येऊन ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी पाहिले असता, तेथे बॉल पडल्याचे दिसले. तक्रारदाराने सहकाऱ्यासह येरवडा पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या डोळ्याखाली जखम झाली होती. त्यातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले. उपचारानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
‘गोल्फ कोर्स क्बलने त्यांच्या खेळाचा सार्वजनिक रस्त्यावरील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी कोणतीही खबरदारी घेतलेली नाही,’ असे तक्रारदाराने नमूद केले आहे.
‘राष्ट्रपतींच्या वाहनावर लागू शकतो बॉल’
गोल्फ कोर्समधील बॉलमुळे दुचाकीस्वार वकील जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचा ताफा विमानतळ रस्त्यावरून जात असताना त्यांच्या वाहनावर गोल्फ बॉल लागू शकतो किंवा अन्य व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांवरही बॉल लागू शकतो. त्यामुळे या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी अॅड.थोरवे यांनी केली आहे.