पुणे – ‘आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’मधून शिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या अनेक महिला अधिकार यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरवपूर्ण उल्लेख करून विशेष सन्मान केला.
‘एएफएमसी’ या संस्थेतील माजी विद्यार्थिनी पुनीता अरोरा या सैन्यात पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल बनल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय याही या संस्थेच्या कॅडेट आहेत. अशा अनेक महिला कॅडेट्स येथून पदवीधर होऊन लष्करात उच्च पदावर पोहोचल्या आहेत, असे मुर्मू म्हणाल्या.
मला आशा आहे, की त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक महिला सैन्यात आपले करिअर निवडतील. ते त्यांच्या हक्कांबद्दल अधिक जागरूक होतील आणि इतर महिलांनाही पुढे जाण्यास मदत करतील, अशी अपेक्षा मुर्मू यांनी व्यक्त केली.
दीक्षान्त संचलनाचे महिलांकडे नेतृत्व
‘एएफएमसी’ दीक्षान्त संचलनाची पाहणी करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये सहभागी झालेल्या बटालियनचे नेतृत्व वर्षा चौहान, पूजा नायक आणि क्षिप्रा शर्मा या तीन महिलांनी केले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रेसिडंट कलर’ (राष्ट्रपतींचा ध्वज) प्रदान करून झाल्यानंतर त्यासह झालेल्या दीक्षान्त संचलनाने सर्वांचे मन जिंकले. संचलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे देखील राष्ट्रपतींनी कौतुक केले.