उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
बारामती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसील कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आजपर्यंत एकूण 3 हजार 439 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
बारामती तालुक्यात 22 गावांच्या एकूण 99 हजार 979 दप्तरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव क. प., देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, कांबळेश्वर, उंडवडी क. प. नारोळी नेपवतळण, कोळोली आंबी खुर्द, मुरुम, वढाणे, वाकी, पणदरे, नीरा वागज, शिर्सुफळ, सोनवडी सुपे, जोगवडी, कारखेल, मुर्टी, करंजे, शिरवली, अंजनगाव या गावाच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरावर सन 1948 पूर्वीची आणि 1948 ते 1967 या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत.
बारामती तालुक्यातील बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात आले आहे, अशीही माहिती नावडकर यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा आंदोलनानंतर प्रशासकीय पातळीवर कुणबी नोंदीसाठी अधिकारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.