आमदार संजय जगताप : निवडणुकीपूर्वीच एक ग्रामपंचायत बिनविरोध
सासवड – पुरंदर-हवेली मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या खासदार व आमदार फंडातून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्यापूर्वीच एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
गावातील नागरिकांत एकोपा निर्माण व्हावा, टिकावा तसेच निवडणुकीवर होणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी हा निर्णय घेतला असून याबाबत आ संजय जगताप यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
यापूर्वी एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात मुदत संपलेल्या 68 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवेळीही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून देण्याबाबत खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी आवाहन केले होते.
त्यावेळी पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींनी यास प्रतिसाद देत या निवडणूका बिनविरोध केल्या होत्या. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि.25) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक होणाऱ्या 15 ग्रामपंचायती
माळशिरस, वीर, गुळूंचे, एखतपूर-मुंजवडी, राजुरी, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, कर्नलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, वाल्हे, कोथळे, रानमळा.