नवी दिल्ली – भाजपने दिल्ली सरकार पाडण्यासाठी केवळ 4 नव्हे; तर 40 आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा नवा आरोप सत्तारूढ आपने केला आहे. त्या आरोपाचा आधार घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आव्हान दिले. आपचे सरकार पाडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 800 कोटी रूपयांचा स्त्रोत भाजपने उघड करावा, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपने आमच्या 4 आमदारांना पक्षबदलासाठी प्रत्येकी 20 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा आरोप आपने बुधवारी केला. त्यानंतर गुरूवारी आपने 40 आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा नवा दावा केला. त्याचा संदर्भ घेऊन केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
आपच्या प्रत्येक आमदाराला 20 कोटी रूपये देण्याच्या उद्देशातून भाजपने 800 कोटी रूपये तयार ठेवले. त्या प्रचंड रकमेचा स्त्रोत जाणून घेण्यास देशाची जनता उत्सुक आहे. तो पैसा वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) आला की पीएम केअर्स फंडातून? कुठल्या मित्रांनी ते पैसे दिले आहेत काय, अशा प्रश्नांची सरबत्ती केजरीवाल यांनी केली.