पुणे – पाणी नियोजनाची बैठक विस्कळीत

पुणे – पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेमध्ये होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक गुरूवारी होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धरणसाठा, शेतीचे आवर्तन आणि 15 जुलैपर्यंत पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पाणीवाटपाबाबत नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मंगळवारी संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र आचारसंहिता दि.2 मे रोजी शिथील झाल्यानंतर ही बैठक घेण्यात येणार आहे.

निवडणुका संपल्याने आणि शेतीचे आवर्तनही आता संपणार असल्याने पाणीवाटपाबाबत महापालिकेला विचार करावा लागणार आहे हे निश्‍चितच आहे. या आधीही पाटबंधारे विभागाने महापालिकेला अनेकदा “वॉर्निंग’ दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनीही मवाळ भूमिका स्वीकारली होती. मात्र आता तेही कठोर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे महापालिकेला आता पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त झाले आहे.

दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे अलिखित धोरण महापालिकेने निवडणुकांआधी सुरू केले होते. मात्र त्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी ते धोरण शिथील केले. मात्र निवडणुका झाल्यानंतर लगेचच 2 मे रोजी म्हणजे गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे.

दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद केला, तर शुक्रवार आणि शनिवारच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. ज्या भागात आधीच पाणी कमी मिळत आहे त्या भागात आणखीनच समस्या निर्माण होतात. त्यामुळे गुरूवारी पाणी बंद करणे ही बाब नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने परवडणारी नसल्याने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करणे किंवा एक वेळ पाणीपुरवठा करणे हा उपाय प्रशासनाच्या समोर होता. त्यानुसारच पाणीपुरवठ्याच्या वेळेचे फेरनियोजन करण्यात आले होते. या नियोजनाचीही निवडणुकांमुळे अंमलबजावणी करण्यात आली नाही. गुरूवारी होणाऱ्या बैठकीत आता कोणता निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.