पुणे – दरवाजात रांगोळ्या… आकर्षक सजावट…रोषणाईचा लखलखाट…नेत्रदीपक आकाशकंदील..परिसर उजळवणारा पणत्यांचा प्रकाश.. घरोघरी सुरू असणारी लगबग अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरण सोमवारी दीपावलीला सुरुवात झाली. परंपरेनुसार गो-वत्स पूजन करत, तिन्ही सांजेला घरोघरी पहिला दिवा प्रज्वलित झाला.
घरोघरी पणत्या प्रज्वलित करत, नेत्रदीपक रोषणाईचा आनंद घेत आणि फराळाचा आस्वाद घेत दीपावलीचा प्रसन्न वातावरणात प्रारंभ झाला. आबालवृद्धांमध्ये आनंद, उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या दिवाळीच्या वातावरणाने करोनामुळे मागील दीड वर्षापासून साचलेले मळभ दूर होण्यास मदत झाली. दिवाळीचा उत्सव देशभरात विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो.
वसुबारसेने दीपावलीची सुरुवात होते. पूर्वी घरोघरी असणाऱ्या गाय-वासरांची पूजा करण्यात येत असे. वाढत्या शहरीकरणामुळे घरोघरी गाय नसल्याने सामूहिक गो-वत्स पूजनाचे आयोजन करण्यात येते. तर अनेक घरांत देवासमोर गायवासराची मूर्ती, प्रतिमा ठेवत पूजा केली.
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील भागांत सूर्यास्तावेळी गाय वासराचे औक्षण करून पूजन करण्यात आले. यावेळी पक्वान्नांचा नैवेद्यदेखील अर्पण करण्यात येतो. विविध सोसायटी, मंडळे, चौकांमध्ये वसुबारसेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मागील वर्षी करोनामुळे यात खंड पडला होता. मात्र यंदा पुन्हा एकदा उत्साहात पूजनाचे आयोजन केले होते.